झपाटलेला चित्रपटातील घरमालक “धनाजीरावांची” खरी पत्नी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री.. एकेकाळी कोल्हापूरच्या नगरसेविकेचे पद सांभाळले

मराठी चित्रपट सृष्टीत असे अनेक कलावंत आहेत ज्यांना आजही आपल्या अभिनयाने ओळखले जाते. आज आपण जाणून घेऊयात मराठीतील या कलाकारांच्या जोडीविषयी ज्यांनी एकत्रित अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका देखील त्यांच्या वाट्याला आलेली पाहायला मिळाली. दिवंगत अभिनेते “दिनकर इनामदार आणि त्यांच्या पत्नी अलका इनामदार” ही कलाकार जोडी आज हयात नसली तरी त्यांनी मराठी सृष्टीला दिलेले योगदान खूप मोलाचे आहे असे म्हणावे लागेल. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल अधिक…

ज्येष्ठ अभिनेते दिनकर इनामदार आणि अलका इनामदार यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अगदी रंजना, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, अशोक सराफ, अलका कुबल, लक्ष्मीकांत बेर्डे या बड्या कलाकारांसोबत त्यांना काम करायची संधी मिळाली. “कलावंतीण”,” इरसाल कार्टी”,” ओवाळणी ” या चित्रपटासोबत आणखी बऱ्याच चित्रपटात दोघांनीही एकत्रित काम केले. दिनकर इनामदार यांच्या वाट्याला मुख्य भूमिका आल्या नसल्या तरी त्यांच्या काही विरोधी भूमिका लक्षात राहण्याजोग्या आहेत. झपाटलेला चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरमालकाची म्हणजेच “धनाजीराव धनवटे” ची भूमिका बजावली होती. चित्रपटाच्या माध्यमातून बोलक्या बहुल्याच्या कार्यक्रमात लक्ष्याने धनाजीरावांची केलेली टिंगल रसिकांना मनमुराद हसवण्यात यशस्वी ठरली होती. त्यांच्या कारकिर्दीत मर्दानी, मराठी बटालियन, ओवाळणी, चोराच्या मनात चांदणं, ज्योतिबाचा नवस हे विविध पैलूंचे चित्रपट साकारले.

तर अलका इनामदार यांनी अनेक चित्रपटात लक्षाच्या आईची भूमिका साकारली. माहेरची साडी, हृदयस्पर्श, आई पाहिजे, दे दणादण, मुंबईचा फौजदार, शेम टू शेम यासारखे चित्रपट त्यांनी गाजवले. एवढेच नाही तर अभिनयासोबत त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत नगरसेविकेच्या पदाचा भार त्यांनी सांभाळला होता. २२ जानेवारी २००४ रोजी अलका इनामदार यांचे निधन झाले त्यापश्चात त्यांचे पती दिनकर इनामदार यांनी देखील १२ ऑगस्ट २००५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
अलका आणि दिनकर इनामदार यांना संजय आणि विनोद ही दोन मुले. संजय इनामदार यांनी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा भार सांभाळला आहे. सध्या त्यांचे कुटुंब कोल्हापूर येथे स्थायिक आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *