जेंव्हा टॉम अल्टर मराठीत काम करतो .. भन्नाट किस्से आणि व्यक्तीमहत्व

निवडक हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून ‘इंग्रज’साकारणारा, भारतात जन्मलेला अभिनेता टॉम अल्टर,केवळ रंग रूपामुळे टॉमला इंग्रजांच्या भूमिका कराव्या लागल्या,सुरवातीला गरज म्हणून त्याने त्या भूमिका स्विकारल्या पण नंतर मात्र त्याने अश्या प्रकारच्या भूमिका करणं बंद केलं.त्याचा गोरा रंग पाहून अनेकांना वाटायचे की टॉम परदेशातून आलेला कलाकार आहे,आणि तसे कुणी त्याला विचारले की तो कोणत्या देशातून आलेला आहे? त्यावर टॉम अभिमानाने सांगायचा “मै हिंदुस्तानी हूँ”. आपली ओळख परदेशी नसून भारतीय आहे आणि पुण्यात फ़िल्म इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतल्याचेही तो कार्यक्रम आणि मुलाखतीमधून आवर्जून सांगायचा.

2002 मध्ये माझ्या’अफलातून’ टीव्ही सिरियल मध्ये पाहुणा कलाकार म्हणून टॉमने एक दिवसाचे काम केले होते,मुंबईहून ट्रेनने तो पुण्यात शुटींगला आला होता,हिंदी चित्रपट,मालिका, इंग्रजी नाटकांमधून काम करणाऱ्या टॉमला जेंव्हा मराठी सिरियल मध्ये काम करायला मी विचारले तेंव्हा हिंदीत त्याला मिळणारी ट्रीटमेंट आणि पैसा, मराठीत मिळणार नाही हे माहीत असूनही तो माझ्याकडे काम करायला तयार झाला. पैश्याच्या आणि इतर कुठल्याही अटी सांगितल्या नाही,उलट इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून मराठीत काम करायची संधी कधी न मिळाल्याची खंत त्याने मला बोलून दाखवली आणि मी मराठीत संधी दिल्याबद्दल माझेच आभार त्याने मानले.शुटिंगसाठी तो ट्रेनने पुण्यात आला,मी त्याची कलाकारांशी ओळख करून दिल्यावर हात जोडून त्याने आदबीने’नमस्ते’ म्हणाल्यावर प्रत्येकाला तो जवळचा माणूस वाटू लागला.प्रकाश इनामदार, विजय चव्हाण,या कलाकारांच्या बरोबर टॉमचे सीन होते शॉटच्या आधी “मी पहिल्यांदा काम करतोय मराठीत, चुकलो मी तर मला तसं सांग” असं नम्रपणे तो म्हणाला. त्यावेळी मी दिग्दर्शक म्हणून नवीन असतानाही मला ‘मान’ देऊन मी सांगेल तसं तो ऐकत होता.डायलॉग मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ तो आधी हिंदीत विचारून घ्यायचा आणि मग मराठीत बोलायचा, एखादा शब्द त्याला बोलायला अवघड जातोय असं दिसलं की मी त्याला पर्यायी सोपा मराठी शब्द द्यायचो त्यावर तो”नही नही महेश,तुम मेरे लिये डायलॉग चेंज मत करना, हो जायेगा मुझसे” असं आत्मविश्वासाने म्हणायचा आणि चहा मागवायचा.टॉमला चहा फार आवडायचा, कपातून चहा न पिता त्याला मोठा ग्लासभर चहा लागायचा.डायलॉग बोलताना तो चुकला की तो मागायच्या आधीच मी चहा सांगायचो,त्यावर विजूमामा ( विजय चव्हाण) गंमतीने टॉमला म्हणाला”आम्ही दिवसभर जेवढं पाणी पीत नाही तेवढा तू चहा पितोस”. मग टॉमनेही हसत उत्तर दिलं” इसका जीम्मेदार महेश है,उसने कहा था पुनामे चाय बहोत बढिया मिलती है इसलीये तो मुझे आना पडा, शुटिंग तो एक बहाणा है”. बोलण्यातून हिंदी आणि उर्दू भाषेवरचं त्याचं प्रभुत्व दिसून येत होतं, लंच ब्रेक मध्ये जेवताना टॉम ने एकाहून एक सरस अश्या शेरो शायरी ऐकवून आम्हा सगळ्यांना तृप्त केलं.महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण त्याने आनंदाने घेतलं, ताटातल्या प्रत्येक पदार्थाचं नाव तो मला विचारत होता ते पाहून मी त्याला सांगितलं की ताटात वाढलेला एखादा पदार्थ परत पाहिजे असेल आणि तो बोलायला अवघड जात असेल तर त्याने हाताने दाखवलं तरी परत वाढता येईल.त्यावर त्याने सांगितलं की “तुम समजे नही महेश,जो सब्जी ज्यादा पसंद आयी है उसका नाम पता हो तो दुबारा जब मै तुम्हारे यहा शुटींग करने आऊंगा तो मै वही सब्जी हकसे मांग सकता हूँ” असं बोलून टॉमने माझीच विकेट घेतली.

प्रेमळ स्वभावाच्या टॉम बरोबर माझी चांगली मैत्री झाली.पुढे दूरदर्शन साठी मी ‘महानगर’ मालिका करत होतो त्यात परदेशातून महाराष्ट्रात मराठी संस्कृती जाणून घेण्यासाठी आलेल्या फॉरेनर एका मराठी कुटुंबात राहून मराठी संस्कृती जाणून घेतो आणि कालांतराने मराठी बोलू लागतो,अशी मोठी भूमिका होती. टॉमला स्वतःलाच मराठी बद्दल प्रेम असल्याने भूमिका ऐकल्यावर तो लगेच हो म्हणाला.दूरदर्शनची सिरियल असल्याने बजेट खूपच कमी होते आणि शुटिंगसाठी दर महिन्याला ठराविक दिवस लागणार होते,मी तसे टॉमला सांगितले.त्यासाठी तो तयार झाला,आणि खरोखरच त्या मालिकेत काम करणाऱ्या मराठी कलाकारांच्या डेट्स प्रमाणे टॉमने पूर्ण सिरीयल संपेपर्यंत स्वतःच्या डेट्स ऐडजेस्ट केल्या. मराठी कलाकारांच्या तुलनेने त्यावेळी तो जास्त प्रसिध्द असतानाही,मराठी दकलाकारांच्या डेट्स प्रमाणे मी का डेट्स ऐडजेस्ट करू?अशी कोणतीही तक्रार त्याने केली नाही. त्याचे कुठेही शुटिंग, कार्यक्रम असेल तरी तिथून मुंबईत पोचून मग पुढे ट्रेनने तो पुण्यात माझ्या शुटिंगसाठी यायचा. याच सिरियल च्या शुटिंगच्या वेळी त्याने मला सांगितले की तो बेंगलोरला हिंदी फिल्मचे शुटिंग करतोय आणि ते संपवून तिथूनच तो पुण्यात येणार आहे,त्यामुळे नेहमीप्रमाणे त्याचे मुंबई पुणे ट्रेनचे तिकीट काढायची गरज नाही,फक्त परत जाताना तो मुंबईला जाणार असल्याने त्याप्रमाणे तिकीट काढून ठेवायला सांगितले. ठरल्याप्रमाणे तो बेंगलोरहून फ्लाईटने पुण्यात आला,माझ्या शुटिंगसाठी तो आल्यामुळे फ्लाईटच्या तिकिटाचा खर्च माझ्या बजेट बाहेर जाणार म्हणून मी जरा काळजीतच होतो,पण पैसे तर देणं आवश्यक होतं म्हणून मी त्याला विचारले तिकिटाचे किती पैसे झाले.”मेरे टिकटके जितने पैसे हुए है उतने पैसोंकी मै तुम्हारे प्रोडक्शनकी चाय पीनेवाला हूं”.असे म्हणत त्याने चहा मागितला आणि पैसे घ्यायला नकार दिला. दुपारी जेवणात पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा,मसूर डाळ असं त्याच्या आवडीचं जेवण मिळाल्याने तो खुश झाला.माझ्या सिरियलच्या शुटिंगसाठी तो बेंगलोरहून पुण्यात आल्याबदल मी त्याचे आभार मानले.”महेश मैने पेहले तुमसे कमिटमेंट की थी, इसलीये दुनियाके किसींभी कोनेमे मै होता तो भी मुझे आनाही था तुम्हारे लिये” असं तो बोलल्यावर मी त्याला मनापासून हात जोडले,मग टॉमने कमिटमेंट वरून त्याच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा मला सांगितला. राज कपूर यांच्या’ राम ‘तेरी गंगा मैली’ चित्रपटाचं तो काश्मीरला शुटिंग करीत होता,छोटी भूमिका होती पण दिलेल्या डेट्स संपत आल्यातरी टॉमचे शुटिंग संपायचे चिन्ह दिसत न्हवते,एका प्रायोगिक इंग्रजी नाटकाच्या शो साठी टॉमने अगोदरच एक तारीख दिली होती कमिटमेंट केल्यामुळे दिलेल्या तारखेला पोचणे गरजेचं होतं.राज कपूर यांना विचारायचे तरी कसे की नाटकासाठी जायचे असल्याने शुटिंग लवकर संपवून मला मोकळं करा,त्यात राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळणं हे टॉमचं स्वप्नं होतं. दोन दिवसांवर नाटकाची तारीख आली तसे टॉमचे टेन्शन वाढत होते,त्याच्या चेहऱ्यावर ते दिसू लागले,शुटिंगच्या लंच ब्रेक मध्ये नाटकाच्या प्रोड्युसरला फोन करण्यासाठी टॉम शुटिंगच्या ठिकाणावरून निघून हॉटेल मध्ये फोन करायला यायचा.शुटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून लंच ब्रेक मध्ये न जेवता टॉम फोन करायला हॉटेलवर जातोय ही गोष्ट राज कपूर यांच्या लक्ष्यात आली, त्यांनी टॉमला जवळ बोलवून काही अडचण आहे का म्हणून प्रेमाने विचारले.टॉमने खरं काय ते सांगितलं,ते ऐकून राज कपूर यांनी टॉमला सांगितले तू माझ्या आधी नाटकासाठी तारीख दिलेली आहेस तर तुला तुझी कमेटमेंट पाळलीच पाहिजे.राज कपूर यांनी टॉमला जाण्यासाठी आणि पुन्हां शुटिंगला येणासाठी फ्लाईटचे तिकीट देऊन त्याला पाठवले.

कस माझ्या सिरियलचे शुटिंग संपवून रात्रीच्या ट्रेनने टॉमला निघायचे होते म्हणून त्याच्या शेवटच्या एका सीन मधले त्याचे क्लोजअप शॉट आधी घेऊन त्याला मोकळं करायचं ठरवलं तेंव्हा त्याच्या बरोबर त्या सीन मध्ये काम करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री(ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या काळात तमाशापट आणि ग्रामीण -शहरी भूमिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या)ज्यांना निघायची घाई न्हवती आणि तसेही त्यांचे काम बाकी होते.त्यांनी माझी अडवणूक केली की टॉमचे शॉट होईपर्यंत त्यांनी अर्धा तास तरी का बसून रहायचं? आणि त्या सिनिअर आहेत तर त्यांचे शॉट आधी घेतले पाहिजे म्हणून त्या अडून बसल्या, मी विनंती करूनही त्या ऐकत नाही हे पाहून टॉमने मला आधी त्यांचे शॉट घ्यायला सांगितले आणि त्याला ट्रेनला उशीर होत असतानाही तो शांत बसून होता,जेष्ठ अभिनेत्री डायलॉग बोलताना सारख्या चुकत होत्या आणि वेळ वाया जात होता,त्यामुळे टॉमची ट्रेनची वेळ निघून गेली,पण परिस्थिती लक्षात घेऊन मला”टेन्शन मत लो महेश मेरे जानेका”.असं बोलून त्याने त्याचं काम संपवले ,मी त्याच्यासाठी मुंबईला जायला टॅक्सी बुक करतो म्हणून त्याला सांगितल्यावर त्याने मला नको म्हणून सांगितले आणि पुण्याहून तो एशियाड बसने मुंबईला गेला. त्यानंतर त्या जेष्ठ अभिनेत्री बद्दल, एक काळ गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणूनच फक्त माझ्या मनात आदर राहिला, माणूस म्हणून त्या मनातून उतरल्या.
पैश्याहून अधिक शब्दाला आणि मैत्रीला महत्व देणारा टॉम माझ्या ‘आधार’ चित्रपटात छोट्या भूमिकेत होता.वेटिंग फॉर गोदोत सारख्या इंग्रजी आणि ‘मिर्झा गालिब’,मौलाना आझाद सारख्या हिंदी उर्दु नाटकांमधून अभिनय करणारा टॉम जुनून मालिकेतील केशव कलसी च्या खलनायकी भूमिकेमुळे विसरता येणं शक्य नाही.शतरंज के खिलाडी, चरस,क्रांती,आशिकी,भेजा फ्राय असे अनेक समांतर आणि व्यवसायीक चित्रपट ,मालिका करीत असताना त्याने अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली. क्रिकेट,अभिनय,लेखन यांमध्ये रमणाऱ्या टॉमला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर त्याचे मोठेपण जगासमोर आले पण स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन न करता साधं आयुष्य जगणारा टॉम सतत बिझी असूनही कधीच त्याने मोबाईल वापरला नाही की गाडी घेतली नाही,रिक्षा टॅक्सीतून फिरताना त्याला कधीच कमीपणा वाटला नाही.
टॉम बरोबर मला सातत्याने खूप काम करता आले नाही पण आमची मैत्री आणि सम्पर्क कधी तुटला नाही, मसुरीलाही त्याचं घर असल्याने मुंबई दिल्ली फ्लाईटने तो जायचा त्यामुळे अनेकदा माझी त्याची भेट मुंबई एअरपोर्टवर व्हायची, त्याला चहा जास्त प्रिय आहे हे माहीत असूनही मी गंमतीने त्याला”चलो टॉम कॉफी पिते है” असं विचारलं की तो”अंगरेज चले गये लेकिन कॉफी की बुरी आदत तुम्हारे लिये छोड गये, मै हिंदुस्तानी हूं इसलीये हिंदुस्तानी चाय पिता हूं”. असं गमतीने मला म्हणत माझ्या शुटिंगच्यावेळी त्याने खाल्लेल्या पिठलं भाकरी ठेचा याची तो आवर्जून आठवण काढायचा.
कॅन्सरमुळे टॉमचे निधन झाले पण कधी चहा पिताना टॉमची आठवण येते,डोळे पाणावतात तेंव्हा अंतर्मन सांगतं,एक होता टॉम-दिलसे सच्चा आदमी अच्छा
लेखक – महेश टिळेकर (मराठी हिंदी फिल्म दिर्ग्दर्शक)

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *