जयश्री गडकर यांनी चित्रपट काढायचा ठरवला आणि गीतकाराची निवड बाळासाहेबांकडे सोपवली.. आठवडा झाला तरी गाणी तयार होईना मग…

जयश्री गडकर आणि त्यांचे पती बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते. चित्रपटाच्या संगीतकाराची धुरा बाळासाहेबांनी सांभाळली होती. गीतकाराची निवड करण्याची जबाबदारी देखील बाळासाहेबांकडेच सोपवण्यात आली होती. त्यावर बाळासाहेबांनी नागपूरला असलेल्या सुरेश भटांना मुंबईत बोलावले. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली. चित्रपटाच्या कथेवरून भटांना त्यांनी ४-५ गाणी लिहिण्यास सांगितले. परंतु ७ दिवस उलटूनही भटांनी एकही गाणे लिहिले नाही. त्यावर जयश्री गडकर यांनी हॉटेलचे वाढते बिल पाहून भटांना पुन्हा नागपूरला जाण्यास सांगितले. (बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर.. त्यांना लाडाने सर्वजण बाळासाहेब किंवा बाळ अशीच हाक मारत)

जयश्री बाईंच्या या निर्णयामुळे भटसाहेब नाराज झाले आणी ‘रेल्वे का टिकट तो मै निकलता हूँ’ असे म्हटले . (सुरेश भट हे नेहमी हिंदीतूनच बोलत असत) “आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल” असे म्हणत जयश्री बाईंना त्यांनी बिल भरण्यापासून थांबवले. बाळासाहेबांनी हॉटेलचे बिल भरले आणि टॅक्सी बोलावली. अचानक टॅक्सित बसल्यावर भट साहेबांनी एक कागद मागितला. तशातच बाळासाहेब हॉटेलमध्ये परत जाऊन एक जुने बिल घेऊन आले. बिलाच्या मागील बाजूस अगदी काही सेकंदातच भट साहेबांनी शब्द लिहिले…
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत मी गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे” काही वेळातच सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे सुपूर्त केला. निःशब्द झालेल्या बाळासाहेबांनी ही कविता जयश्री आणि बाळ धुरी यांना दाखवली. डोळ्यातील पाणी पुसत १५००० रुपयांचा चेक जयश्री बाईंनी भट साहेबांना देऊ केला. “यह मेरी अमानत है और मैं मेरी अमानत कभी बेचता नहीं, रखो आप इसे ” असे म्हणून तिथून निघून गेले. पण जयश्री बाईंचा हा चित्रपट काही बनला नाही आणि हे गीत बाळासाहेबांकडेच राहिले.

पुढे जब्बार पटेल “उंबरठा” चित्रपट बनवत होते. भट साहेबांना विचारून त्यांनी हे गीत चित्रपटात वापरण्याचे ठरवले. परंतु जब्बार पटेल यांनी या गीतातील केवळ एका शब्दावर आक्षेप घेतला.
“कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे कुणीतरी आरश्यात आहे.” चित्रपटाची नायिका विवाहित असल्याने “कुणीतरी” शब्दाला पटेल असून बसले होते. भट साहेबांना ह्या जागी दुसरा शब्द सुचेना. गाण्याची चाल, लता दीदी, स्टुडिओ सगळे अगदी तयार असताना शांता शेळके तिथे लता दिदींना भेटण्यासाठी आल्या. सोप्प आहे असे म्हणत ‘कुणीतरी’ च्या जागी ‘तुझे हसू’ घालण्याचे त्यांनी सुचवले. “वाह!, शांता वाह” उद्गार काढत जब्बार पटेलांनी त्यांचे कौतुक केले.गझलच्या ठेक्यातील हे गाणे एका टेकमध्ये तयार झाले आणि अजरामर झाले. हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा स्मिता पाटील लता दिदींच्या पायाशी धाय मोकलून रडल्याची आठवण बाळासाहेबांनी सांगितली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *