काही दिवसांपूर्वी सर्वच शाळांमध्ये “गोवर आणि रुबेला” लसीकरण मोहिमेबाबत पालकांना माहिती देण्यात आली होती. नारू, पोलिओ या आजारासारखेच गोवर आणि रुबेला सारखे आजार देशभरातून मिटावेत यासाठी ही मोहीम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.गोवर मुळे अंगाला पुरळ येणे ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील ‘ अ ‘ जीवनसत्वाची मात्रा कमी होते. अधिक ताप वाढल्यास मेंदूज्वर,आंधळेपणाही येऊ शकतो. साधारण अशाच स्वरूपाची लक्षणे रुबेला मध्येही काही अंशी दिसून येतात. अचानक गर्भपात होणे, विकलांग मुले जन्माला येणे हे टाळता यावे म्हणून ९ महिने ते १५ वर्षापर्यंत च्या पाल्याला ही लस सर्वच शाळांमध्ये शासनाने अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
असे असले तरी याबाबत अजूनही पालकांमध्ये साशंकता असल्याचे समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्यात येत असली तरी अजूनही बऱ्याच शाळामध्ये ही लस देणे बाकी आहे. मध्यंतरी या लसीकरणामुळे काही तुरळक प्रमाणात विद्यार्थ्यांना रिऍक्शन झाली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे पालकांमध्ये अजूनही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
ह्या रिऍक्शन का होतात ते जाणून घेऊयात…
अगदी कमी तापमानात या औषधांच्या बाटल्या ठेवणे जरूरीचे असते. म्हणजे एकतर ती फ्रीज मध्ये किंवा आईसबॉक्स मध्ये ठेवली जाते. एकदा उघडलेली बाटली ४ तासाच्या आत १० डोसमध्ये संपवावी लागते. यात जर चूक झाली तर अशी रिऍक्शन होण्याची संभावना होऊ शकते
ही लस घेताना आपल्या पाल्याला जर ताप किंवा आजारी असेल तर तशी कल्पना त्यावेळी देणे आवश्यक आहे. यामुळेदेखील काही अंशी रिऍक्शन झाल्याचे आढळून येते. त्यामुळे अशा कल्पना अगोदरच देणे आवश्यक आहे.