“होता खंडो म्हणून वाचला शंभो” ही म्हण ज्यांच्यामुळे समाजात रूढ झाली ते म्हणजे स्वामीभक्त, निष्ठावंत खंडोजी बल्लाळ. कालच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत मांडवी नदीच्या पात्रातून छत्रपती संभाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्यास मदत केली ती खंडोजी बल्लाळ चिटणीस यांनी. त्यांच्या या निस्सीम स्वामीभक्तीची प्रचिती मालिकेच्या माध्यमातून सर्वांना अनुभवण्यास मिळत आहे. आज ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराविषयी अधिक जाणून घेऊयात…

खंडोजी बल्लाळ चिटणीस यांची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेते “संजीव भारत तांडेल ” यांनी. संजीव तांडेल यांनी बी व्ही पॉलिटेक्निक , वसई येथून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील भारत तांडेल हे मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील जाणते कलाकार सुरुवातीच्या काळात त्यांनी रिजर्व बँकेत नोकरी केली होती. नोकरी करत असतानाच अनेक राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका, प्रायोगिक नाटकांत ते हिरीरीने सहभागी व्हायचे यातून त्यांनी अनेक बक्षिसेदेखील पटकावली होती. त्यांनी प्रेमानंद गज्वी लिखित ‘तन- माजोरी’ या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. वडिलांनी मिळवलेले हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नव्हते त्यासाठी त्यांनी आपला जिद्दीने संघर्ष सुरू ठेवला होता. वडिलांचा हाच वारसा जपत संजीव तांडेल यांनी देखील अभिनय क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. अगदी लहानपणापासूनच आपण अभिनेता बनायचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते, परंतु या क्षेत्रातील वडिलांचा संघर्षमय प्रवास पाहता आईने त्यांना आधी आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सांगितले होते. आईने दर्शविलेल्या विरोधामुळे अभिनयाचे कुठलेही शिक्षण न घेता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण संजीव यांनी पूर्ण केले. पुणे, मुंबईत काही दिवस नोकरी केली. त्यादरम्यान अक्षदा सोबत लग्नही झाले. त्यानंतर नोकरीनिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळाली. परंतु सर्व काही सुरळीत चालू असतानाही मनात कायम एक खंत वाटत राहिली ती म्हणजे ‘मला अभिनेता बनता आले नाही’ याची.

परंतु आपले स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी हीच जिद्द त्यांनी अंगी बाळगून सुरुवातीला एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धेत सहभाग दर्शवून उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळवली. ‘संगीत मत्स्य गंधा’, कृष्णविवर, रंगारी, गैरसमज करून घेऊ नका, बारोमास, इंद्रधनूच्या गावा ही नाटके त्यांनी रंगभूमीवर गाजवली. १०० डेज, जय मल्हार, विठू माऊली, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शौर्य, आवाज- अहिल्याबाई होळकर, अस्मिता, गणपती बाप्पा मोरया, जयोस्तुते, फिरकी फिरकी, मनात माझ्या या मालिका त्यांनी अभिनित केल्या. “कानभट” मराठी चित्रपट, ब्लॅक टोर्नाडो-26/11 वेबसिरीज, सीआयडी, खाकी-एक वचन, क्या तू मेरी लागे या हिंद मालिकाही त्यांनी साकारल्या. याशिवाय Amplifon Hearing Aid ची व्यावसायिक जाहिरात आणि कीप इट क्लीन, शी अँड सी ह्या इंग्रजी लघुपटात ते झळकले. स्वराज्यरक्षक संभाजी याच मालिकेत त्यांनी खंडोजी बल्लाळ समवेत किल्लेदार ‘जिजाजी काटकर’ आणि जोधपूर घराण्याचा दिवाण या भूमिका देखील बजावल्या. आजवरच्या प्रवासात त्यांच्या वाट्याला बहुतांशी ऐतिहासिक आणि अध्यात्मिक भूमिका आलेल्या पाहायला मिळतात. याच भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांच्या मनात आपली खरी ओळख निर्माण करता आली.
संजीव तांडेल यांनी साकारलेले ‘स्वामीभक्त खंडोजी बल्लाळ’ खऱ्या आयुष्यातही असेच असावेत असा विश्वास निर्माण होतो. त्यांच्या या भूमिकेसाठी संजीव तांडेल या कलाकाराला मानाचा मुजरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *