एक हसरा तारा-शरद तळवलकर असा माणुसकी असलेला कलाकार पुन्हा होणे अशक्य.. शरद तळवलकर यांचे काही किस्से

महेश टिळेकर मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. मराठी तारका म्हणून जे मराठी अभिनेत्रीचं ब्रॅण्डिंग करतात ते हेच महेश टिळेकर. अगदी सामान्य घरातून मेहनत घेऊन मिळेल ती कामे करून आज प्रगती केलेला एक उत्तम कलावंत ते यशस्वी डायरेक्टर आणि फिल्म प्रोड्युसर. महेश टिळेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर शरद तळवलकर आणि मी असे काही किस्से शेअर केलेत. अगदी उत्तम लेखणीतून शरद तळवलकर यांचे किस्से लिहले जे वाचून त्यांचा मेहनतीचं आणि विनोदबुद्धीच दर्शन घडेल.

एक हसरा तारा-शरद तळवलकर.
नाव आणि आडनावात कुठे ही काना,मात्रा,वेलांटी नसलेला, नावाप्रमाणेच सरळ आयुष्य जगणारा मराठी कलावंत शरद तळवलकर. सगळेजण त्यांना ‘काका’ म्हणत,पण चित्रपटसृष्टीत राहूनही त्यांनी आयुष्यात कधीच कुणाला’मामा’बनवलं नाही.
प्रसंगी स्पष्टपणे बोलणारे, हजरजबाबी, मस्करी करत जगण्याचा आनंद घेणारे शरद काका मनाने ही तितकेच हळवे होते.एकदा त्यांच्याशी मैत्री झाली की मग त्या शरदाच्या चांदण्यात फिरताना पुरेपूर आनंद मिळणार.
एकच प्याला, सखी शेजारणी,बिनधास्त ही त्यांची नाटकं मी पुण्यात बालगंधर्वला पाहिली होती.
1997 साली शरद काकांची आणि माझी खरी ओळख झाली ती मी प्रथमच दिग्दर्शक म्हणून करीत असलेल्या टेलिफिल्म च्यावेळी.त्यात त्यावेळचे अनेक नावाजलेले कलाकार काम करीत होते,प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून आपआपली प्राईझ मला सांगितली होती,त्याप्रमाणे मी बिल्डर असलेल्या निर्मात्याला खर्चाचा अंदाज दिला.शुटिंग सुरू होऊन एक दोन दिवस झाले ,सगळं व्यवस्थित सुरू असताना एक दिवस टेलिफिल्म चे निर्माते शुटिंग पाहायला आले,मी कलाकारांची ओळख करून दिली.त्या ओळखीचा फायदा घेत आणि निर्माता पैशानी श्रीमंत आहे हे कळल्यावर काही पुरुष कलाकारांनी शुटिंग संपल्यावर रात्री प्रोड्युसर बरोबर श्रमपरिहाराचा कार्यक्रम केला. प्रोड्युसरच्याच पैश्यानी फुकट दारू प्यायला, पाहिजे ते खायला मिळाल्यावर ही कलाकार मंडळी खुश झाली,आणि पिताना कलाकारांनी केलेल्या स्तुतीमुळे दोन पेग पोटात गेल्यावर प्रोड्युसरचं विमान हवेत उडू लागलं.रात्रभर चाललेल्या पार्टी मुळे साहजिकच दुसऱ्या दिवशी ही कलाकार मंडळी शुटींगला उशिरा आली त्यानंतर मग दररोज रात्री पार्ट्या होऊ लागल्या. प्रोड्युसरचे पैसे संपल्यामुळे पुढं शुटिंग बंद झाले,पण प्रोड्युसर बरोबर पार्ट्या करणाऱ्या कलाकारांनी गोड बोलून मला आधी सांगितले होते त्यापेक्षा जास्त पैसे आधीच काढून घेतले. त्यांनी ही ‘कला’दाखवल्यामुळे इतरांना द्यायला प्रोड्युसर कडे पैसे शिल्लक राहिले नाहीत आणि म्हणुनच शरद काकांना प्रोड्युसरने पैसे दिलेच नाही.ज्या कलाकारांनी स्वतःची हुशारी वापरून आधीच भरपूर पैसे प्काढले होते त्या प्रत्येकाला नंतर मी विनंती केली की तुमचे ठरलेले पैसे तुम्ही ठेवून घ्या आणि वर जे तुम्ही जास्त पैसे प्रोड्युसर कडून काढले आहेत ते जर मला परत दिले तर शरद काका आणि आणखी दोन जेष्ठ कलाकारांना पैसे देता येतील, पण एकाने ही माणुसकी दाखवली नाही. आपल्या ओळखीचे म्हणून आपण या कलाकारांना काम करायला बोलावले पण पैसा पाहिल्यावर या कलाकारांची बदललेली रुपं पाहून मला मात्र मानसिक त्रास जास्त झाला.माझ्यामुळे शरद काकांचे नुकसान झाले असे मला वाटले आणि म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. घडलेला सगळा प्रकार त्यांना आधीच बाहेरून समजला होता. मला धीर देत ते म्हणाले”ह्या अनुभवातूनच शिकत तुला पुढं जायचंय,मला माझ्या कामाचे पैसे नाही मिळाले त्याचं दुःख नाही,ज्या कलाकारांनी जास्त पैसे काढून स्वतःच फायदा करून घेतला त्यांना आयुष्यभर ते पैसे पुरणार नाहीत,तुझ्या चांगुलपणाचा फायदा ज्या कलाकारांनी घेतला तेच परत येतील तुझ्याकडे काम मागायला.स्वतः जेंव्हा प्रोड्युसर होशील तेंव्हा कलाकारांना, फार पैसे नाही देऊ शकला तरी,जे देशील ते आधी ठरवून वेळेवर दे. चांगुलपणा किती आणि कुणासाठी दाखवायचा हे ही तुला समजलं पाहिजे”.शरद काकांनी दिलेला हा मोलाचा सल्ला पुढे मला खूपच उपयोगी पडला.

टेलिफिल्म पूर्ण होऊ न शकल्यामुळे पुन्हा कामाची संधी मी शोधत असतानाच नीना राऊत यांनी दूरदर्शन साठी’डोक्याला डुलकी’ ही छोटे छोटे विनोदी स्कीट्स असलेली मालिका करण्याची संधी मला दिली,लता थत्ते,राजा मयेकर,इर्शाद हाश्मी, मनोरमा वागळे, यांच्या बरोबरच काही नवीन कलाकार घेऊन मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओ मध्ये शुटिंग करायचे होते,नाटक,सिनेमात काम करणाऱ्या शरद काकांनी टीव्ही मालिकेत काम करणे नेहमीच टाळले होते,पण मी विचारल्यावर माझ्यासाठी म्हणून मालिकेत काम करायला ते तयार झाले.दोन दिवस मुंबईत राहायचे होते,इतर कुठेही मोठया हॉटेलमध्ये न राहता काकांनी ते मुंबईत आल्यावर नेहमी ज्या ठिकाणी राहायचे त्या दादरच्या रानडे रोडवरील अतिशय साध्या अश्या ब्लु जेम हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितली आणि डेक्कन क्वीन ट्रेनच्या सेकंड क्लासचीच तिकिटे बुक कर म्हणून मला सांगितले. मला जास्त खर्च नको म्हणून शरद काका मला सेकंड क्लासने जाऊ म्हणत असतील असे मला वाटले, पण एवढा मोठा कलाकार आपल्यासाठी सिरियल मध्ये काम करायला तयार झाले म्हटल्यावर मी मुद्दामच डेक्कन क्वीनच्या फस्ट क्लासची तिकिटं काढली.
रिक्शानी शरद काका आणि मी स्टेशनवर पोचलो,काका सेकंड क्लास बोगी कडे जायला निघाल्यावर मी त्यांना सांगितले की आपली तिकिटं फस्ट क्लासची आहे,ते ऐकून शरद काका जरा चिडले,ट्रेन सुरू झाली.फस्ट क्लास मध्ये सगळेच स्टॅण्डर्ड लोक,कुणी इंग्लिश पेपर वाचत बसलेले, तर कुणी न बोलता शांत बसलेले, कसला आवाज नाही,कुजबूज नाही.ते पाहून काका मला म्हणाले “पाहिलंत,एखाद्याला स्मशानात पोचवून आल्यासारखे सगळे गंभीर चेहरा करून शांत बसलेत” काकांचं बोलणं ऐकून मला हसू आलं,मग काकांनी सांगितलं की असं शांत बसून प्रवास करणाऱ्या आणि जीवन जगणाऱ्या लोकांची कीव वाटते त्यांना.आयुष्य कसं खळखळ हसून जगलं पाहीजे. सेकंड क्लासने प्रवास करताना कसं माणसात आल्यासारखं वाटतं.पुढे मग शांततेवरून त्यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा काकांनी मला सांगितला, कॉलेजमध्ये शिकत असताना ते नाटकांमधून ही कामं करायचे, विनोदी आणि प्रसंगी वात्रट स्वभाव असल्याने कॉलेजमधले सगळेच शिक्षक त्यांना चांगलेच ओळखून होते,त्यातल्याच एका कडक शिस्तीच्या शिक्षकाच्या मुलीवर शरद तळवलकर यांचे प्रेम होते,लग्नासाठी त्या शिक्षकांची संमती मिळवण्यासाठी शरद तळवलकर जेव्हा जेंव्हा त्यांना भेटत असे त्यावेळी ते नेहमीप्रमाणे चिडलेले असायचे, त्यामुळे त्यांच्या मुलीला लग्नाची मागणी घालण्याचं धाडस व्हायचं नाही,खूप प्रयत्न केल्यावर मग मुलीनेच सांगितले की वडील जेंव्हा शांत असतील तेंव्हाच लग्नाचा विषय काढ.काही दिवसांनी शिक्षकांची पत्नी वारली, ते कळताच शरद तळवलकर स्मशानभूमीत पोचले, अंत्यसंस्कार झाल्यावर जमलेले लोक निघून गेले,पत्नीच्या जळणाऱ्या चितेकडे पहात शिक्षक शांतपणे उभे होते,ते पाहून शरद तळवलकर त्यांच्या जवळ गेले आणि”मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, तुमची परवानगी पाहिजे” असे बोलून मोकळे झाले.हा किस्सा मला सांगून शरद काका आणि मी दोघेही जोरात हसू लागलो,दादर स्टेशन येईपर्यंत शरद काकांनी मला नॉनस्टॉप हसत ठेवलं. स्टेशनवर उतरल्यावर मी हातातील सामान घायला कुली म्हणून हाक मारल्यावर त्यांनी मला थांबवलं आणि सांगितलं काही गरज नाही कुलीची मदत घ्यायची,दहा मिनिटाच्या अंतरावर तर जायचंय,विनाकारण पैसे कश्याला खर्च करायचे?साधी राहणी साधं आयुष्य जगणारी जुन्या पिढीतील ह्या काही कलाकार मंडळींनी आपला ‘मोठेपणा’नेहमी आपल्या कामातूनच दाखवला,त्यांच्या सहवासातून मला मात्र खूप शिकायला मिळाले.
दूरदर्शनच्या मालिकेचे शुटिंग संपवून पुण्यात आल्यावर काही दोन दिवसांनी शरद काकांनी मला घरी बोलावले,दूरदर्शन सिरियल च्या कामाचे त्यांना जे पैसे मिळाले होते त्यातून फक्त पाचशे रुपये स्वतःकडे ठेवून बाकी सगळे पैसे त्यांनी माझ्या हातात दिले,मी ते नको म्हणून सांगितल्यावर “तुला राहुदेत हे,मी नाटकात काम करण्याचे जे पैसे घेतो तेवढेच पैसे मी तुझ्याकडून घेणार”.मी ते पैसे परत देऊ लागल्यावर मला काय करायचेत एवढे पैसे,राहुदेत तुला, आधीच्या टेलिफिल्म मध्ये पण तुला काहीच पैसे मिळाले नाहीत, सध्या तुझा स्ट्रगल चालू आहे तुला उपयोगी पडतील हे पैसे” असे म्हणून माझ्या खिशात त्यांनी ते पैसे ठेवले. दुसरा एखादा कलाकार असता तर त्याने आधीच्या कामाचे बुडालेले पैसे वसूल केले असते,पण शरद काकांनी माझी’वेळ’जाणली. त्यानंतर त्यांना घेऊन मी काही टीव्ही जाहिराती केल्या,टेस्टी मिसळ नावाचा विनोदी स्टेज कार्यक्रम केला पण त्यांनी जास्त पैसे दिले तरी ते घेतले नाही,मी मला फायदा झालाय त्यामुळे तरी तुम्ही घ्या असे सांगूनही,आग्रह करूनही पाचशेच्या वर कधी एक रुपयाही जास्त घेतला नाही. एकदा मात्र मी त्यांना एका जाहिरातीचे चांगले पैसे मिळाले म्हणून हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं ठरवलं. रिक्शानी आम्ही निघालो,रिक्षा चालक’नमुना’होता विमान चालवावं तसं वेगानं तो रिक्षा चालवत होता त्यामुळे दणके बसल्यावर शरद काकांनी’आई इईई गं’ असं बोलल्यावर ‘काय त्रास होतोयका” असं उलट रिक्षा चालकाने विचारल्यावर”हो ना,खूपच त्रास होतोय,अजून दणके बसले तर बहुतेक बाळंत होईल मी” असं काका बोलल्यावर रिक्षावाला पण हसू लागला,पुढे जरा अंतरावर गेल्यावर टर्न घेताना चालकाने काकांना सांगितले”काका जरा हात दाखवा बाहेर”.क्षणाचाही विलंब न लावता हजरजबाबी काका म्हणाले”हाता ऐवजी पाय दाखवला तर चालणार नाही का”.
चित्रपटातून विनोदी आणि गंभीर भूमिका ताकदीनं करणारे शरद काकांना ते आजारी असताना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो होतो,आजारपणामुळे प्रकृती खालावल्यामुळे बारीक झालेले शरीर, नेहमीप्रमाणे दिसणारं चेहऱ्यावरचं तेज गायब झालं होतं मी त्यांच्या हाताला स्पर्श करताच डोळे उघडून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात ते माझ्याशी बोलू लागले,गप्पांच्या ओघात मी त्यांना सांगितलं की” गुडडी मारुती हिचं लग्न झालं.शरीरानं अवाढव्य असणारी हिंदी चित्रपटात विनोदी भूमिका करणारी गुडडी मारुती हिने शरद काकांच्या बरोबर माझ्या कार्यक्रमातून काम केलेले होते,त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती.गुडडीच्या लग्नाची मी बातमी सांगताच”कुणी केलं धाडस तिच्याशी लग्न करण्याचं?”.असा प्रश्न विचारून आजारपणातही आपला हजरजबाबी गुण त्यांनी दाखवला.
शरद काका आज आपल्यात नाहीत,एखादया आनंदाच्या प्रसंगी,सक्सेस सेलिब्रेट करताना मला त्यांची आठवण येते आणि वर आकाशात पाहिल्यावर असंख्य ताऱ्यांच्या मधून माझ्याकडे पाहून हसणारा एक तारा मला दिसतो

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *