old actress look now

एकेकाळी मराठी चित्रपटांत सुपरहिट ठरलेल्या आणि आजही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी ऐकावीशी वाटतात अश्या एका सोज्वळ आणि तितक्याच देखण्या अभिनेत्रीबद्दल आज जाणून घेऊयात… तांबडी माती, धर्मकन्या, राजा शिवछत्रपती, पाठराखीण, देव माणूस, आधार , एक माती अनेक नाती अशा अनेक मराठी चित्रपटातून अभिनेत्री “अनुपमा” यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. “गोड गोजिरी लाज लाजरी हे गाणं त्यांच्यावर चित्रित झालेलं जे आजही तितकंच फेमस आहे लग्नाच्या कॅसेट्मधे हे गाणं आवर्जून लावलं जातं . मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अनुपमा यांचे मूळ नाव रेखा कुलकर्णी. २३ एप्रिल १९५० रोजी त्यांचा मुंबईतील एका साधारण कुटुंबात जन्म झाला. माटुंगा येथील लोकमान्य विद्यामंदिर येथुन त्यांनी शालेय शिक्षण घेतले तर पुढील शिक्षण त्यांनी रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले.

old marathi actress
old marathi actress

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘आसावरी ‘ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या नाटकातील अनुपमा हेच नाव पुढे त्यांनी आत्मसात केले. ‘घरची राणी’ या पहिल्याच चित्रपटातून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या. त्यानंतर मराठी चित्रपटासोबतच त्यांनी हिंदी, गुजराती चित्रपट सृष्टीत देखील प्रवेश मिळवला. संसार, दो बच्चे दस हाथ, सास भी कभी बहू थी, पाप और पुण्य, फरार अशा हिंदी चित्रपटातून अनेक दिग्गज कलाकारांसोबत महत्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. याच काळात जेसल तोरल, धरती ना लोलु या गुजराती चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले त्यासाठी गुजरात सरकारकडून त्यांना गौरविण्यात आले होते. चित्रपटासोबतच अपराध मीच केला या नाटकातूनही त्यांनी काम केले. चित्रपट, नाटक असा प्रवास चालू असतानाच डॉ दिलीप धारकर यांच्याशी त्या विवाहबंधनात अडकल्या आणि ‘अनुपमा धारकर’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. आज त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. अमेरिकेतील शिकागो येथे त्या स्थायिक असून अभिनय क्षेत्राशी आजही त्या निगडित आहेत. शिकागो येथील हरहुन्नरी कलाकारांसोबत ‘माऊली’ हे नाटक त्यांनी रंगभूमीवर सादर केले. त्याला प्रेक्षकांकडून तुफान असा प्रतिसाद देखील मिळाला होता. गेल्या वर्षी तेजश्री प्रधान आणि आस्ताद काळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकाच्या प्रयोगालाही त्या हजर राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी कलाकारांचे भरभरून कौतुक देखील केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *