ashi banva banvi lata thate

कितीही वेळा पाहिला तरी ज्याला तुम्ही अजिबात कंटाळणार नाहीत असा तो चित्रपट म्हणजे “अशी ही बनवाबनवी”. विनोदाचे अचूक टायमिंग काय असते हे या चित्रपटातील कलाकारांनी पुरेपूररित्या आपल्या सजग अभिनयातून दर्शवून दिलेले पाहायला मिळाले .अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुशांत रे यांच्याप्रमाणेच सुधीर जोशी यांनी या चित्रपटात विश्वास सरपोतदारांची भूमिकादेखील तितक्याच ताकदीने उभारली होती. तर त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री “लता थत्ते” यांनी निभावली होती. आज अभिनेत्री लता थत्ते यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…

ashi hi banva banvi pic
ashi hi banva banvi pic

अशी ही बनवाबनवी चित्रपटात अभिनेत्री लता थत्ते यांच्या वाट्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच डायलॉग आले असतील परंतु त्यातूनही त्या सारपोतदारांच्या पत्नी म्हणून प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहतात. लता थत्ते या नाट्य तसेच सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. देवता, अष्टविनायक, थोरली जाऊ, अपराध, झुंज अशा अनेक चित्रपटातून लता थत्ते यांनी सह कलाकाराच्या भूमिका बजावल्या. दिल्या घरी तू सुखी रहा, अपराध मीच केला, नाथ हा माझा, घरोघरी हीच बोंब, दिवा जळू दे राती अशा अनेक नाटकांमधून त्यांनी रंगभूमी गाजवली होती. ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकातून त्यांनी साकारलेली भांडकुदळ नानी विशेष लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली. नाटक, चित्रपट असा प्रवास चालू असतानाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला तो कायमचाच. अविवाहित असलेल्या लता थत्ते यांनी फेब्रुवारी २०१२ सालीच वयाच्या ७८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. अंबरनाथ येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. चित्रपटातील लता थत्ते, सुधीर जोशी, नयनतारा, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, विजू खोटे, बीपीन वर्टी, जयराम कुलकर्णी, सुहास भालेकर असे बरेचसे कलाकार आज हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या आठवणी कायम रसिकांच्या स्मरणात राहतील एवढे मात्र नक्की. त्यांच्या या स्मृतींना विनम्र अभिवादन!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *